सकाळ वृत्तसेवा
Wednesday, February 02, 2011 AT 12:00 AM (IST)
सांगली - वादळी चर्चेनंतर ओबीसींच्या जनगणनेचा निर्णय लोकसभेत पंतप्रधानांनी जाहीर केला खरा; पण, येत्या 9 ते 28 फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या प्रत्यक्ष जनगणनेच्या कुटुंब पत्रकात मात्र ओबीसींच्या नोंदीसाठी कोणतीही तरतूद नाही. जातिनिहाय जनगणना जून ते सप्टेंबर 2011 या कालावधीत स्वतंत्रपणे टप्प्या टप्प्याने होणार आहे. मुख्य जनगणनेसोबत जातिनिहाय जनगणना सहज शक्य असताना प्रशासनाने हा द्रविडी प्राणायम केला आहे.
गेल्या वर्षी प्रगणकांनी प्रत्येक कुटुंबापर्यंत फिरून माहिती गोळा केली होती. त्या नंतर नव्याने अनेक मुद्दे चर्चेत आले. त्यात जातिनिहाय जनगणनेचा मुद्दा प्रकर्षाने देशभर चर्चेत आला. दोन्ही बाजूंनी त्यावर मतमतांतरे व्यक्त झाली. शेवटी ओबीसींच्या जनगणनेचा आग्रह मान्य झाला. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात म्हणजे येत्या 9 फेब्रुवारीपासून या जनगणनेला सुरवात होणार असे गृहीत धरण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र नव्याने प्राप्त झालेल्या कुटुंब माहितीपत्रकात आणखी नव्याने अनेक प्रकारची माहिती विचारण्यात आली आहे.
पत्रकातील आठवा स्तंभ जातीच्या माहितीचा आहे. यामध्ये अनुसूचित जाती आणि जनजातीची माहिती पूर्वीप्रमाणेच विचारली असली, तरी त्यात ती व्यक्ती कोणत्या उपजातीची आहे याचा तपशील विचारण्यात आला आहे. त्या नुसार प्रगणकांनी अनुक्रमे 1 किंवा 2 असा क्रमांक त्या स्तंभात लिहावयाचा आहे. यांपैकी नसेल तर म्हणजे उत्तर नाही असेल तर 3 लिहावयाचे आहे. याचा स्पष्ट अर्थ असा होतो, की या दोन जाती व त्यातील उपजातींचीच 9 ते 28 फेब्रुवारीदरम्यान नोंद होणार आहे. या माहितीच्या स्तंभासाठी स्वतंत्र टीप देण्यात आली असून त्यात अनुसूचित जाती हिंदू, शीख, बौद्ध धर्मांतच असतात. अनुसूचित जनजाती कोणत्याही धर्मामध्ये असू शकतात, असे नमूद करण्यात आले आहे.
कुटुंब माहितीपत्रकात विचारलेली नवी माहिती अशी - विवाहाबरोबरच त्या समयीचे वय विचारण्यात आले आहे. कमी वयात लग्नाचा शोध घेण्यासाठी ही माहिती विचारण्यात आली आहे. यांशिवाय हिंदू मुसलमान, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि जैन या धर्मांचीही नोंद होणार आहे. यांशिवाय धर्म असेल तर त्याचा सांकेतांक क्रमांक न देता थेट धर्माचा उल्लेख करण्यास सुचवले आहे. स्तंभ क्रमांक नऊमध्ये अपंगत्वाबद्दलची माहिती विचारण्यात आली असून त्यात पाहण्यात, ऐकण्यात, बोलण्यात, हालचाल करण्यात, मतिमंद, मानसिक आजार, इतर काही आणि बहुविध अपंगत्व असे उपपर्याय देण्यात आले आहेत.
बेरोजगारीचे प्रमाण शोधण्यासाठी स्तंभ क्रमांक 15 ते 16 मध्ये वर्षभरात नेमके किती काळ आणि कोणते काम मिळाले याचा तपशील विचारला आहे. सहा महिने किंवा त्या पेक्षा अधिक, 3 महिने किंवा त्या पेक्षा अधिक असा सखोल तपशील त्यात आहे. उद्योग-व्यवसायांचाही तपशील पुढील दोन स्तंभींमध्ये विचारला आहे. त्यामध्ये मालक, कर्मचारी, एकटा, कुटुंबात काम करणारे अशी वर्गवारी केली आहे. बिनआर्थिक कार्यामध्ये विद्यार्थी, घरकाम, आश्रित, निवृत्त, भाडे घेणारा, भिकारी, इतर अशी वर्गवारी केली आहे. रहिवास व कामाचे ठिकाण यातले अंतर विचारण्यात आले आहे. स्थलांतरितांसाठी त्यांच्या वेळा, कामाचे स्वरूप असा तपशील विचारला आहे. मृत झालेल्या मुलांचे प्रमाण विचारण्यात आले असून त्यातून अर्भक मृत्यूची माहितीसंकलनाचा उद्देश आहे. गेल्या वर्षभरातील मृत अपत्यांच्या माहितीसाठी स्वतंत्र स्तंभ आहे. या वेळची जनगणना बहुउद्देशाने होत असल्याचे यावरून स्पष्ट होते.
जातिनिहाय जनगणनेच्या मुद्द्याबाबत नाशिकचे खासदार समीर भुजबळ म्हणाले, 'या बाबत केंद्रीय गृह विभागाच्या रजिस्ट्रार जनरल कार्यालयाशी मी संपर्क साधला असता तेथील मुख्य अधिकारी प्रतिभा कुमारी यांनी मुख्य जनगणनेनंतर म्हणजे जूनमध्ये जातनिहाय गणना होणार असल्याचे सांगितले. त्यासाठीचे काम अंतिम टप्प्यात आहे.''
अशी होईल जनगणना...
9 ते 28 फेब्रुवारी कुटुंब माहितीपत्रक भरून घेणे
28 फेब्रुवारी मध्यरात्रीपर्यंत रस्त्यावर झोपलेल्या बेघरांची (भिकारी) मोजणी
1 ते 5 मार्च ः दुसरी फेरी (या फेरीत 9 ते 28 फेब्रुवारी या कालावधीतील जन्म-मृत्यूची नोंद करणे)
जून ते सप्टेंबर 2011 या कालावधीत जातनिहाय जनगणना
No comments:
Post a Comment